शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याजवळ बाँबगोळा सदृश्य वस्तू?


भाळवणी प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याजवळ रमेश सोनाजी चेमटे यांच्या शेताच्या बांधावर जुन्या काळातील बॉंबगोळा सदृश्य वस्तू आढळली आहे.

     मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे हे शृंगऋषी गडाकडे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. या भागात रमेश सोनाजी चेमटे यांची शेती असून शेताच्या कडेला काल त्यांना बाँबगोळा सदृश्य वस्तू दिसली होती. चेमटे यांनी याबाबत तरटे यांना माहिती दिली. गतवर्षी याच भागात बाँबगोळा सदृश्य वस्तू आढळली होती. त्यावेळी लष्कराचे विंग कमांडर अजितकुमार भट्टाचार्य यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता ती वस्तू जुन्या काळातील बाँबगोळा असल्याचा निर्वाळा दिला होता. १६ आॕगस्ट १९७१ रोजी लष्कराचे रशियन बनावटीचे विमान बिघाड झाल्याने या डोंगराला धडकले होते. या घटनेत दहा जवानांना जीव गमवावा लागला होता. विमानाचे अवशेष व त्यातील वस्तू या परिसरात विखुरल्या होत्या, त्यातील ही वस्तू असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी सापडलेल्या वस्तू बाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र सायंकाळपर्यंत कोणीही घटनास्थळी फिरकले नाही. सध्या या वस्तू भोवती दगड ठेवून त्यावर पालापाचोळा टाकून झाकून ठेवण्यात आलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या