डॉ.गोकुळ क्षीरसागर यांना उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार


शेवगाव प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार डॉ. गोकुळ क्षीरसागर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कळमरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमाच्या  सफल आयोजनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो . 

डॉ गोकुळ क्षीरसागर हे शेवगाव येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,शेवगाव येथे हिंदी विभाग प्रमुख तसेच  विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या अध्ययन अध्यापन व संशोधनासोबतच   विविध समाज उपयोगी आणि  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये  मुख्यतः कोविडच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने चार हजार मास्क निर्मिती आणि मोफत वाटप,  वृक्षारोपण,  लोकशाही पंधरवडा, स्वच्छ भारत अभियान, मतदार जाणीव जागृती, कोविड जाणीव-जागृती, प्लास्टिक मुक्ती, नाट्य महोत्सवाचे आयोजन, नाट्य प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन, पथनाट्य एकांकिका आणि नाटकांच्या तसेच शॉर्ट फिल्म निर्मितीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम त्यांनी  केले आहे. याशिवाय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे वक्ते असून त्यांनी विविध महाविद्यालयात अनेक व्याख्याने दिलेली आहेत. त्यांचे विविध जर्नल्स मधून दर्जेदार शोधनिबंधांचे व पुस्तक प्रकाशन झाले आहे. त्यांनी देश-विदेशात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधआलेख सादरीकरण केलेले आहे. त्यांच्या अशा विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार नंदकुमार झावरे पाटील व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या