केंद्राकडून सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट
नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर गेलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिले आहे. बुधवारी सायंकाळी केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली. यात पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कपात करण्यात आली आहे. आज गुरुवारपासून ही शुल्क कपात लागू होईल.
उत्पादन शुल्कात केल्यामुळे उद्यापासून पेट्रोलचे दर प्रती लीटर पाच रुपयांनी कमी होतील. तर शुल्क कपातीमुळे डिझेल तब्बल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. इंधन दरवाढीने मागील महिना दीड महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरात प्रचंड वाढ झाली होती. पेट्रोल ११० रुपयावर गेले तर डिझेलने शंभरी गाठली होती.
सलग सात दिवस पेट्रोल दरवाढ केल्यानंतर आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.८५ रुपयावर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.६६ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.४९ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.८३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.९३ रुपये इतके आहे.
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.६२ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ९८.४२ रुपये इतके आहे. चेन्नईत १०२.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.५० रुपये आहे.
राज्याने व्हॅट कमी केल्यास आणखी दरकपात
कपातीमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल, असा आशावाद केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना देखील पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यांनी व्हॅट कमी केला तर नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या