पेट्रोलऐवजी मद्यावरील करकपात!

 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : उत्पादन शुल्क केले निम्म्याने कमी; विदेशी दारु होणार स्वस्त

 


लिंपणगाव 

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला कर कमी केल्यानंतर राज्य शासनानेही इंधनावरील कर कमी करावेत, अशी मागणी केली जात आहे. विरोधी पक्षाने त्यासाठी आंदोलने केली. तथापि, राज्य सरकारने त्यास प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे विदेशी मद्यावरील कर निम्म्याने कमी करून तळीरामांना सुखद धक्का दिला. ठाकरे सरकारने गुरुवारी मद्यविक्रीबाबत हा मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे मद्यप्रेमींना आता अर्ध्या किंमतीत चक्क विदेशी दारुचा आस्वाद घेता येणार आहे. यामुळे  इतर राज्यातून होणारी मद्य तस्करी किंवा बनावट दारूच्या अवैध उद्योगाला आला बसेल. त्याचबरोबर  विदेशी मद्याची आयात वाढेल, मद्यविक्री वाढेल, त्यातून कर वाढेल, अशी सरकारला आशा आहे. 

महाराष्ट्र सरकारने आयात केल्या जाणाऱ्या (इम्पोर्टेड) विदेशी दारुवरील (स्काॅच, व्हिस्की) उत्पादन शुल्कात चक्क ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इतर राज्यात विकल्या जाणाऱ्या किंमतीतच आता महाराष्ट्रातही स्कॉच, व्हिस्की मिळणार आहे.

याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतीच माहिती दिली. त्यानुसार, स्कॉच-व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. या दारुच्या उत्पादनशुल्क उत्पादन खर्चाच्या ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना गुरुवारी (१८ नोव्हेंबर) जारी केल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे तळीरामांना स्वस्तात विदेशी मद्य चाखता येणार आहे.

महसूल २५० कोटीपर्यंत वाढणार

आयात केल्या जाणाऱ्या ‘स्कॉच’च्या विक्रीतून राज्य शासनाला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, आता सरकारने उत्पादन शु्ल्कात कपात केल्याने स्काॅचची आयात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यातून सरकारचा २५० कोटीपर्यंत महसूलवाढ मिळू शकते, असा अंदाज आहे. 

दारुच्या तस्करीला आळा बसेल

उत्पादन शुल्क अधिक असल्याने चोरी-छुप्या मार्गाने राज्यात विदेशी दारु येत होती. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्याने इतर राज्यांतून महाराष्ट्रात होणारी ‘स्कॉच’ची तस्करी, तसेच बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार असल्याचा शासनाचा अंदाज आहे. 

विक्रीत दुप्पट वाढ होण्याची आशा

कर कपातीमुळे महाराष्ट्रात आयात केल्या जाणाऱ्या व्हिस्कीची किंमत कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज १ लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्याने आता अडीच लाखांवर ही विक्री पोहोचू शकते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या