रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खा. विखेंना साकडे


लिंपणगाव प्रतिनिधी 

नगर- दौंड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 रस्त्यावरील लोणी व्यंकनाथ येथील पारगाव फाटा ते लोणी व्यंकनाथ कानिफनाथ वाडी येथील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात लोणी व्यंकनाथच्या ग्रामस्थांनी खासदार डॉ सुजय विखे यांना रस्ता दुरुस्ती संदर्भात साकडे घातले आहे.

दरम्यान खा. डॉ. सुजय विखे हे नगर दौंड रस्त्याच्या महामार्गातून श्रीगोंदा तालुक्‍याच्या दौऱ्यावर येत असताना लोणी व्यंकनाथ येथील नगर दौंड या रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात खासदार विखे यांना लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे. 

या निवेदनात येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, या भागात राहणारे शेतकरी फुटलेल्या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे  द्राक्ष बागा, लिंबोनी बागा तसेच तरकारी पिके खराब झाली आहेत. ह्या धुळीच्या साम्राज्यामुळे बाजारपेठेत तरकारी भाजीपाल्यांच कवडीमोल किंमत होत आहे. केवळ धुळीच्या साम्राज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले हॉटेल, मंगल कार्यालय, तसेच छोटे-मोठे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांचा देखील रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मिळून येथे एकदा रस्ता रोको आंदोलन केल्याची जाणीव सुद्धा खासदार विखे यांना येथील शेतकऱ्यांनी करून दिली त्यावेळी डांबरीकरण करून देऊ असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत काम झालेले नाही. याप्रसंगी राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांनीदेखील खा विखे यांना या महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

खा.विखे यांना दिलेल्या निवेदनावर सचिन डांगे, रामदास कांडेकर, लालासाहेब शेख, निसार शेख, देविदास खेतमाळीस, राजेंद्र कोकाटे आदी  शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या