त्रिपुरा निषेध मोर्चा महाराष्ट्रात हिंसक : नांदेड, मालेगावमध्ये तोडफोड, दगडफेक


मुंबई 

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली तर अनेक दुकाने जबरदस्तीने बंद करण्यात आली. नांदेड, मालेगावमध्ये हिंसाचाराच्या घटनांनी दहशत माजवली.

नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांच दुकाने आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळं दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावाने दगडफेक केली. त्यामुळे जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

भिवंडीतही मुस्लिम समाजानं बंद पुकारला. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे.

दरम्यान अमरावतीत निघालेल्या मोर्चाची कुठलीही परवानही घेण्यात आली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. मोर्चेकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले.

हिंगोलीत मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. त्रिपुरा राज्यांत भरदिवसा मुस्लिमांना मारहाण करण्यात आल्याने आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यंना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. दरम्यान आज शहरातील भाजिमंडी परीसरात शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्हयातील कलमनुरी शहरात देखील आपली अस्थापने बंद ठेवून निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव निषेधात सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व निदर्शने शांततेत झाली आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या