विहीरीत पडलेल्या महिलेचे वाचले प्राण


पुणे  प्रतिनिधी

सोमवार पेठेतील पेशवेकालीन दांडेकर वाड्यातील विहिरीमध्ये पाय घसरुन पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत मदत करुन तिचे प्राण वाचविले. सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. या महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिच्यावर के ई एम रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, सोमवार पेठेत दांडेकर (मोटे)वाडा असून तेथे पेशवेकालीन विहीर आहे. ही विहीर गाळाने व पालापाचोळ्याने भरली आहे. या विहीरीत महिला पडली असल्याचा कॉल अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला आला. त्याबरोबर मध्यवर्ती केंद्रातून एक बंब, देवदूत व रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी रवाना झाली. आमचे जवान पोहचले. तोपर्यंत ही ४२ वर्षांची महिला गाळात पूर्ण फसली होती. हळूहळू बुडत होती. जवानांनी तातडीने रश्शी व लाईफ रिंग टाकून तिला आवाज देऊन ते पकडण्यास सांगितले. पाठोपाठ जवान खाली उतरले. त्यांनी या महिलेच्या काखेत रश्शी बांधून तिला तातडीने वर घेतले. तोपर्यंत तिची शुद्ध हरपली होती. तिला जवळच्याच के ई एम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार केल्यावर काही वेळात ही महिला शुद्धीवर आली.

या वाड्यात कोणी रहात नाही. विहीरही वापरत असल्याचे दिसून येत नाही. विहीरीच्या कडेला नळ आहे. तेथे पाणी भरण्यासाठी त्या महिला आल्या असाव्यात व पाय घसरुन पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे, प्रदीप खेडेकर, चालक हनुमंत कोळी, नवनाथ मांढरे तांडेल राजाराम केदारी व जवान छगन मोरे, सचिन जौंजाळे, प्रकाश शेलार, मयुर कारले, केतन नरके, विशाल गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या