शहीद गोविंद पानसरे यांची जयंती उत्साहात


शेवगाव,  प्रतिनीधी 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत शहीद गोविंद पानसरे यांनी  शेतकरी ,कामगार, शेतमजुर, सर्वसामान्य जनतेचा लढा पुढे नेण्याबरोबर महापुरूषांचे विचारांतून सर्वसामान्य जनतेच्या हिताची क्रांती करण्याचे मोठे काम केले, असे प्रतिपादन माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व एसटी कामगार संघटनांच्यावतीने शेवगाव येथे बुधवारी ( दि. २४ )  शहिद पानसरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

माजी प्राचार्य देवढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ,फतिमा, रमाबाई, कार्लमार्क्स, लेनिन, एंगल्स,शहिद भगतसिंग, सुखदेव ,राजगुरु या महापुरूषांच्या विचारातुन क्रांती करण्याच काम गोविंद पानसरे यांनी केलेले आहे. 

कम्युनिस्ट विचाराने प्रभावित गोविंद पानसरे यांनी मोठ्याप्रमाणात जनआंदोलने करुन जनतेला दिशा देण्याच काम केले आहे. शिवाजी कोण होता? हे कॉ. पानसरे यांनी लिहलेले पुस्तक प्रचंड गाजले. खऱ्या अर्थाने रयतेचा राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर आणण्यात पानसरे हे पुस्तक व भाषणाद्वारे यशस्वी झाले.

यावेळी रोटरी क्लबचे सचिव माजी उपप्राचार्य प्रा. किसनराव माने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यकौन्सिल सदस्य संजय नांगरे यांचीही भाषणे झाली. या वेळी बाबुलाल सय्यद,एस टी कामगार नेते दिलीप लबडे, राजेंन्द्र घुगे, अरुण गर्जे, संजय धनवडे, दिलीप बडधे, अमजद पठाण, राजेंद्र देवढे, बाळासाहेब जाधव, अमजद शेख आदिसह बहुतांशी नागरीक व सर्व एस टी कर्मचारी ऊपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या