हृदयरोग पीडित गरीब मुलांसाठी ५० लाखांची मदत!

लग्नातील खर्च टाळून उपराष्ट्रपतींच्या नातीचा आदर्श 


हैदराबाद

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नात सुषमा चौधरी यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या विवाहातील वायफळ खर्च टाळून तब्बल ५० लाख रुपयांची मदत हृदयरोगाने पीडित गरीब मुलांसाठी उपलब्ध करून देत एक आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवले. 

विवाह हा लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यातच, आठवडाभर चालणारे विवाहसोहळे, याप्रसंगी केली जाणारी वारेमाप उधळण हे आजकाल एक 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून ओळखले जाते. अनेकदा 'वेडिंग प्लानिंग', विवाहपूर्व सोहळे आणि प्रत्यक्ष विवाहप्रसंगी केली जाणारा खर्च हा कोट्यवधींच्या घरात असतो. मात्र, हा सगळा देखावा टाळत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नात सुषमा यांनी गरीब मुलांसाठी मदतीचा हात पुढे करत आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला.

बालदिनाच्या निमित्ताने सुषमा यांनी ५० लाख रुपयांचा निधी दान म्हणून दिला. रविवारी आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हैदराबाद स्थित 'हृदय - क्योर ए लिटिल हार्ट फाऊंडेशन' या संस्थेकडे हा चेक सोपवण्यात आला आहे. आजी-आजोबा आणि आई-वडिलांच्या मदतीने सुषमाने हा ५० लाख रुपयांचा निधी उभा केला.

येत्या महिन्यात हा लग्नसोहळा आहे. मात्र, गरीब मुलांच्या उपचारात मदत व्हावी यासाठी विवाह समारंभात होणारा वारेमाप खर्च टाळून साधेपणाने विवाह सोहळा करण्याचा निर्णय सुषमा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या