Breaking News

आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप



औरंगाबाद: बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस  आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास 1000कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी केला आहे. विविध देवस्थानांच्या तब्बल 450 एकर जमीन लाटल्याचा ठपका धस यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवण्यात आला असून सामान्य माणसाची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार, खर्डा येथील विठोबा देवस्थान, आष्टीतील पिंपळेश्वर महादेव, मानूर येथील श्री विरुपाक्ष स्वामी गुरू, श्री गिरीस्वामी मठ, चिंचपूर दर्गा येथील जमिनींबाबत गैरव्यवहार झाल्याच आरोप करण्यात आळा आहे. देवस्थानांच्या व मशिदींच्या जमिनी उपभोगत होते, त्यांच्याकडून खूपच अल्पदरात इनाम जमिनी विकत घेऊन त्याच्यावर प्लॉटिंग सुरु केली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे वक्फ बोर्ड व धर्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेतलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी बळकावण्यासाठी चुकीची व खोटी कागदपत्रे पुरवण्यात आली आहे तसेच सर्व रोजनामे एकाच दिवशी तयार करुन खोटे रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments