महापालिकेमार्फत राज्यातील पहिली सर्वात मोठी 'सिटी लायब्ररी'


पुणे:


लेखक, प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयांचा उत्तुंग सांस्कृतिक वारसा महापालिकेची सिटी लायब्ररी जपेल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेमार्फत राज्यातील पहिली सर्वात मोठी 'सिटी लायब्ररी' होणार आहे.


या 'सिटी लायब्ररी' च्या प्रेझेंटेशनची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या तत्कालीन पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयानंतर पुण्याची ग्रंथालय परंपरा पुढे नेण्याचे काम करणारी राज्यातील पहिली 'सिटी लायब्ररी' घोले रस्त्यावर साकारत आहे. ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असणारे हे ग्रंथालय शहरातील मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असेल. स्थानिक नागरिक, अभ्यासक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आदींसाठी महापालिकेचे हे सुसज्ज ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेचे 'मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय' आणि कोठी आहे. त्याभोवती महापौर निवास, 'पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन', 'राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी', क्षेत्रीय कार्यालय अशा वास्तू आहेत. या जागेचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी एकत्रितपणे विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पादरम्यान मांडला होता. त्यातील मोडकळीस आलेल्या 'मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालया'चा पुनर्विकास करून तेथील सुमारे ३५ हजार चौरस फूट जागेवर 'सिटी लायब्ररी'ची उभारणी केली जाणार आहे.

नागरी सेवा परीक्षा, बॅंकिंग परीक्षा, लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी पुण्यात येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तळमजला अधिक तीन मजले अशी रचना असलेल्या या इमारतीमध्ये सुरुवातीला एकाच वेळी किमान ४०० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढविण्याची तरतूदही इमारतीच्या आराखड्यात करून ठेवली आहे. येथे एकूण ५० हजार पुस्तके व नियतकालिके उपलब्ध असतील. ४० संगणक असलेली डिजिटल लायब्ररी हे या 'सिटी लायब्ररी'चे वैशिष्ट्य असणार आहे.

'मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाचे १५ जानेवारी पासून स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु होईल व लवकरच या सिटी लायब्ररी चा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
'लेखक आणि प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयांच्या रूपात पुण्याला उत्तुंग सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अशा या शहराचे आपले स्वतःचे भव्य ग्रंथालय असावे, या हेतूनेच 'सिटी लायब्ररी' विकसित होते आहे. हे ग्रंथालय पुण्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल.' असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका निलीमा खाडे, सुनील पांडे,रवींद्र साळेगावकर, आनंद छाजेड, जय जोशी तसेच पुणे मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या