पत्रकार दातीर खून खटल्यातील पसार आरोपी कान्हू मोरे जेरबंद!

 मध्य प्रदेशात महाराजाच्या रुपात करत होता वास्तव्य  राहुरी:
राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या बहुचर्चित खून प्रकरणातील पसार आरोपी कान्हू मोरे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने काल (गुरुवारी) राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे जेरबंद केले. मोरे जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना पोलिसांना चकवा देवून, पसार झाला होता. विशेष असे की, तब्बल पाच महिन्यांपासून तो मध्य प्रदेशात महाराज बनून राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 एप्रिल महिन्यात पत्रकार दातीर यांच्या खुनाची घटना घडली होती. 

उल्लेखनिय असे की, मोबाईल लोकेशनशिवाय एलसीबीच्या पोलिसांनी मोरेच्या मुस्क्या आवळल्या. पत्रकार दातीर यांचे अपहरण करुन, त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कान्हु मोरेसह साथिदारांविरोधात भादंवि कलम 302, 363, 341, 120 (ब) अन्वय्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी मोरेला अटक केली होती, मात्र न्यायालयीन कोठडीत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, परंतू मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने (दि.28) ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी त्याला पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले. ससून हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी अ‍ॅब्युलन्समध्ये बसण्यासाठी सांगितले, मात्र लघुशंकेचा बहाणा करुन, तो तेथून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पो. हवालदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप पवार, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरूड, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड आदींचे पोलीस पथक पसार कान्हू मोरेचा शोध घेत होते. 

हा शोध सुरु असताना पोउनि सोपान गोरे यांना गुप्त बातमी मिळाली की, मोरे हा मध्यप्रदेश येथे बडवा जिल्ह्यात आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार हे पथक मध्यप्रदेश येथील बडवा जिल्ह्यात जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोरेचा शोध घेत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पसार झाला होता. यानंतर त्याला मदत व आसरा देणारे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुगे ता. पाथर्डी), सतिश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी, खुर्द ता. राहूरी) यांना तोफखाना पोस्टे येथील नमूद गुन्ह्यामध्ये भादंवि कलम 212 वाढीव कलम लावून त्यांना अटक करण्यात आल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलीस पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या