राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला



मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील मेळाव्याला परवानगी द्यावी म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसने अखेर हा मेळावाच रद्द केला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.

भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट आहे. त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यता आला आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असं भाई जगताप यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर रोजी हा मेळावा होणार होता. या मेळाव्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. आम्ही 15 दिवसांपासून राज्यसरकारकडे मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो, असं भाईंनी सांगितलं. तसेच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या