धर्मशाळा : 31 व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी (सब ज्युनियर) अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने इतिहास रचला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या उना येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेली स्पर्धा महाराष्ट्राने सहज जिंकली. बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर आणि किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या किशोर गटाने आतापर्यंत ही स्पर्धा 10 वेळा जिंकली आहेत, तर किशोरी गटाने 15 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. विशेष म्हणजे किशोर गटाने सलग सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.
गेल्या वर्षी ही स्पर्धा झारखंड येथे खेळवण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्राच्या किशोर गटाने विजेतेपद मिळवलं होतं, तर किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. महाराष्ट्राने यंदा मात्र दुहेरी मुकुट पटकवला आहे. अशी कामगिरी माहाराष्ट्राने आतापर्यंत 6 वेळा केली आहे. दरम्यान, या स्पर्धेतील ‘भरत’ पुरस्कार महाराष्ट्राच्या आशीष गौतमला प्रदान करण्यात आला तर सानिका चाफेला ‘ईला’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
यंदा किशोर गटात कर्नाटकला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर पश्चिम बंगाल आणि हरयाणाचे संघ तिसऱ्या क्रमाकावर राहिले. तर किशोरी गटात पंजाबचा संघ उपविजेता ठरला. राजस्थान आणि दिल्लीने तिसरा क्रमांक पटकावला.
0 टिप्पण्या