येवल्याचा गुटखा तस्कर वैजपुरात जेरबंद!


वैजापूर : 

शहरालगत असलेल्या येवला रोडने गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला औरंगाबाद येथील वाहतूक शाखेच्या पोलीसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास ४८ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ताब्यात घेतल्याची कारवाई केली. शेख दानीश शेख रईस (रा.देवीकुंडजवळ मोमीनपुरा येवला जि.नाशिक) असे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्याचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील वाहतूक शाखेचे पोउपनि बी एम जमधडे, पोलीस नाईक संतोष राठोड, विक्रम बागल आदी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असतांना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर पांढऱ्या रंगाच्या गोणीत राज्यात बंदी असलेला गुटखा अवैध विक्रीसाठी शहरात आणत आहे. माहिती मिळताच पथकाने येवला रोडलगत असलेल्या एका महाविद्यालय परिसरात सापळा रचला. थोड्याच वेळात पथकाला 
मोटारसायकल क्रमांक (एमएच १५ ईयु ०६०२) वर समोर पांढऱ्या रंगाची गोणी ठेवून एक जण येताना दिसला. यावेळी त्याला थांबवून पोलीसांंनी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख दानीश शेख रईस रा. येवला असे असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीसांनी त्याच्याजवळील गोणीची झाडाझडती घेतली असता गोणीत ४८ हजार १७५ रुपयांचा गुटखा मिळून आला.  पोलीसांनी शेख दानीश याच्यासह गुटखा व मोटरसायकल जप्त केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सूरू होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या