वाहुन चाललेल्या वारकऱ्याचा जीव एनडीआरएफने वाचवला


आळंदी :


 येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असताना पाय घसरून कार्तिकी यात्रेला आलेल्या ज्येष्ठ वारकर्‍याचा जीव सुरक्षेसाठी आळंदीत आलेल्या एनडीआरएफ पथकाने रेस्क्यू करून वाचवला बीड जिल्ह्यातील इंजेगाव येथील रघुनाथ कराडे (वय वर्षे 60) यांना रेस्क्यू करण्यात आले ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजता घडली आहे. 

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ वारकरी हा इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान करण्यासाठी आलेला होता, यावेळी हे ज्येष्ठ वारकरी पाय घसरून पाण्यात पडले, इंद्रायणी नदीत कार्तिकी यात्रेनिमित्ताने पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहत जात होते, ही बाब एनडीआरएफ पथकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या ज्येष्ठ वारकऱ्याला पाण्याच्या बाहेर काढले,संबंधित ज्येष्ठ वारक-याला प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून लाखो भाविक वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आलेले आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरक्षेसाठी आळंदी नगरपरिषद,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जय्यत तयारी केलेली आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी योग्य ती दक्षता घेत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या