शिरुरच्या तहसिलदारांची तडकाफडकी बदली


सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या लढ्याला यश     

शिरुर: शिरुरच्या तहसिलदार लैला शेख या पदावर कार्यरत असतांना त्यांच्या विरुध्द सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी संदर्भाधीन पत्रान्वये शासनास अहवाल सादर केला असुन त्यानुसार तळेगांव ढमढेरे येथील शासकीय धान्य गोदामामधून अवैध गौण खनिजाचे वाहतुक केल्याच्या कारणावरून जप्त करुन ठेवण्यात आलेली चार वाहने पळून गेल्याबाबत तहसिलदार यांच्या विरोधात अनेक तक्रारी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने लैला शेख यांची बदली करण्यात आल्याची सगळीकडे चर्चा आहे.

तसेच शिरुर तालुक्यांतील सर्व खाणपट्ट्यांच्या संदर्भात तपासणीबाबत आणि शिरुर तहसिल कार्यालयात काही प्रकरणांत जाणीवपुर्वक कमी दंड आकारण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गौण खनिजाचे परीमाण मोजले जाऊन त्यामध्ये कमी परीमाण दर्शवुन कमी दंडाची आकारणी केली जात असल्याबाबत तसेच वाहन तपासणी करतांना जप्त केलेल्या गौण खनिज पंचनाम्यामध्ये वाळू नमूद असूनही ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर त्यामध्ये क्रशसँड असल्याचा अहवाल आल्यावरून ते सोडून देण्यात आले असल्याबाबत व इतर अनेक विषयांबाबतच्या तक्रारी श्रीमती लैला शेख, तहसिलदार शिरुर, जि. पुणे यांच्याविरुध्द तक्रारदारांनी  दाखल केलेल्या असल्याबाबत विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी प्राप्त अहवालात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे तहसिलदार लैला शेख यांच्याविरुध्द करण्यात आलेल्या अनेक तक्रारींमध्ये तथ्य दिसून आले असल्याबाबत पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय यांनी त्यांच्या उपरोक्त अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

शिरुर येथे तहसिलदार म्हणून काम पाहत असतांना लैला शेख यांनी आवश्यक ते गांभीर्य राखलेले नसल्याबाबत तसेच लैला शेख यांच्या विरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत व सदर कारवाई होईपर्यंत त्यांची इतरत्र बदली करण्याबाबत विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी उक्त अहवालान्वये शासनास शिफारस केलेली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासकीय कर्मचान्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(५) नुसार, लैला शेख, तहसिलदार यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकान्याच्या मान्यतेने, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे. असा आदेश काढण्यात प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी शिरूर महसूलच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अनेक दिवसांपासून पुराव्यानिशी जोरदार आवाज उठवला होता. बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करून अखेर तहसीलदार यांची बदली करण्यात आली आहे. तहसिलदार लैला शेख यांनी भ्रष्टाचार करून चुकीची कामे केल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . त्यांच्याकडून ते वसूल करुन त्यांचे निलंबन होईपर्यंत शांत बसणार नाही.असे सामाजिक कार्यकर्ते अशोकभोरडे  यांनी "दै. राष्ट्र सह्याद्री" शी बोलताना सांगितले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या