बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार






 बीड: बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उस्मानाबादेत तर तीन मतदारसंघात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर या तिन्ही मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बीडमध्ये पाच नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. चारही पंचायत समितीत शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, वडणीतील तीन मतदान केंद्रांवर भाजप आणि राष्ट्रवादीत प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात मतदान सुरू असताना शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रकरण हामरीतुमरीवर आलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गट आक्रमक झाल्याने कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे वाद अधिकच पेटला आणि बघ्यांची गर्दीही वाढल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांना पांगवावे लागले. पोलिसांच्या लाठीमारानंतर दोन्ही गटातील वाद निवळला आणि मतदान शांततेत सुरू झालं.

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी आणि केज नगरपंचायतसाठी मतदान सुरू आहे. एकूण 78 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी 65 जागेंसाठी निवडणूक असून तब्बल 216 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. दरम्यान निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झालीय.

उस्मानाबादच्या तेर येथे अभ्यासिकेचे सामान ठेवण्यावरून सत्ताधारी व विरोधात हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरोधात ढोकी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी 4 ग्रामपंचायत सदस्यांवर गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या