औरंगाबाद बनावट नोटा देऊन दारू खरेदी करणे पडले महागात


भाडोत्री खोलीत नोटा छापणाऱ्यांचा भांडाफोड

औरंगाबाद : शहरातील मुकुंदवाडी परिसरात एका भाडोत्री खोलीत सुरु असलेला बनावट नोटा छापण्याचा उद्योग पुंडलिक नगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला.  आरोपींनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाईन शॉप मधून बनावट नोटा देऊन दारू खरेदी केल्याने हा भांडाफोड झाला.

पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के खटाने यांना याबाबत माहिती मिळाली होती. 27 डिसेंबर रोजी एका व्यक्तीने सुपर वाईन शॉप मधून दारू खरेदी करताना बनावट नोटा दिल्या. पोलिसांनी सापळा लावून त्या व्यक्तीचा शोध घेतला. संबंधित व्यक्तीचे नाव रघुनाथ ढवळपुरे असल्याचे समोर आले. मुकुंदवाडी येथे एका भाडोत्री खोलीत ढवळपुरे यांच्यासह अक्षय पडूळ, दादासाहेब गावडे, पोलिसांच्या यादीतील गुन्हेगार समरान उर्फ लकी रशीद शेख, नितीन चौधरी  हे तेथे बनावट नोटा छापत असल्याचे समोर आले.

 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 500, 100 आणि 50 रुपयांच्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा, एक कम्प्युटर, ऑल इन वन प्रिंटर, कार, 5 मोबाइल असा 3 लाख 10 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  अशा प्रकारच्या बनावट नोटा आढळून आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या