राजकीय इच्छाशक्ती अभावी स्वतंत्र पोलीस स्टेशन पासून वंचित


 पाटस : 


दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस येथील पोलीस चौकी मागील पंधरा वर्षापासून स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यापासून वंचित आहे. तालुक्यातील राजकीय लोकनेत्यांची इच्छा शक्ती नसल्याने पाटस पोलीस स्टेशनचा प्रलिंबत प्रश्न पुन्हा एकदा शासनाच्या गृहविभागात धुळ खात पडला आहे. खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडविणे अपेक्षित होते.
     राज्य शासनाच्या गृहविभागाने पुणे जिल्ह्यातील पाच ठिकाणी नव्याने स्वतंत्र पोलीस ठाण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. तर दौंड तालुक्यातील पाटस पोलीस चौकीचा स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मात्र मागील पंधरा वर्षांपासून राज्यशासनाच्या गृहविभागात धुळखात पडून आहे. केवळ तालुक्याचे आजीमाजी लोकप्रतिनीधी यांच्या इच्छा शक्तीचा अभाव आणि स्थानिक गाव पुढाऱ्यांचा पाठपुरावा नसल्याने पाटस पोलीस चौकी पुन्हा एकदा स्वतंत्र पोलीस स्टेशन पासून वंचीत राहिले आहे.    
        दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या अंतर्गत पाटस आणि केडगाव अशा दोन पोलीस चौकी आहेत. यवत पोलीस स्टेशनचे कार्य क्षेत्र फार मोठे आहे. कार्यक्षेत्राच्या तुलनेते पोलीस कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या, कर्मचारी यांच्यावरील कामाचा वाढता ताण, नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाटस पोलीस चौकीला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा मिळावा, अशी पाटस व परिसरातील ग्रामस्थांची मागील पंधरा वर्षापासूनची मागणी आहे.

 पाटस पोलीस चौकीला स्वंतत्र दर्जा मिळवा यासाठी तत्कालीन पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक प्रतापराव दिघावकर यांनी गृहविभागाला प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी पुणे जिल्ह्यात भिगवण व राजंणगाव  स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजुर झाले आणि पाटस पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तसाच शासन दरबारी प्रलंबित राहिला तो अद्यापही प्रलंबित आहे. 
         यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेली पाटस पोलिस  चौकीचे कार्यक्षेत्र पाहता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याबळ कमी असल्याने या चौकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाचा  वाढता ताण आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्या,  यामुळे नागरिकांची गैरसोय होते. पाटस पोलीस चौकीच्या अंतर्गत पाटस, वरवंड, हातवळण, कडेठाण, कानगाव, पडवी, देऊळगावगाडा, कुसेगाव, हिंगणीगाडा, रोटी, बिरोबावाडी, असे एकूण अकरा गावांचा समावेश आहे. यामध्ये पाटस, कानगाव व वरंवड ही तीन मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. पाटस पोलीस चौकी लगत पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग व पाच किलो मीटर अंतरावर लोहमार्ग गेला आहे. एक साखर कारखाना, तीन चार मोठ्या कंपन्या आहेत. पाटस, रोटी व सुपा असे तीन नागमोडी घाट पोलीस चौकीच्या हद्दीत आहेत. 
           पुणे सोलापुर महामार्गावर सातत्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत असतात. तर रोज किरकोळ शेतजमिनीचे वाद, हाणामारी,  चोरीच्या घटना ही सातत्याने कार्यक्षेत्रात घडत आहेत. त्यामुळे दररोज या पोलिस चौकीत तक्रार घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच या पोलीस चौकीच्या हद्दीत खुन, दरोडे, वाहनचालकांना लुटमार, दरोडे, आत्महत्या अशा गंभीर स्वरूपाच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. पाटस पोलीस चौकीचे कार्यक्षेत्र व परिसराचे आर्थिक, राजकीय व भौगलिक परिस्थीती पाहता याठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे. तसेच एक पोलिस निरिक्षक, एक सहाय्यक पोलिस निरिक्षक व तीस पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. येथे पोलीस स्टेशनला मुबलक जागा ही उपलब्ध असून तसा ठराव ही ग्रामसभेत मंजुर केला आहे. पोलीस चौकीला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव ही यवत पोलीस स्टेशनकडून सन 2017-18 मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र नुकतीच जिल्ह्यात पाच पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून यामध्ये पाटसचा समावेश नाही.
 परिणामी पुन्हा एकदा पाटस पोलीस चौकी स्वतंत्र पोलीस स्टेशनपासून वंचीत राहिल्याने ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या