मतदारांचा विश्वासघात केला : सचिन अहिर


पुणे-

 पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी 2017 साली मोठ्या विश्वासाने भाजपला महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिली. या मतदारांचा भाजपने विश्वासघात केला आहे. आता भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आगामी निवडणूका शिवसेना आत्मविश्वासाने लढणार आहे असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी केले. 

पिंपरी चिंचवड शहरात देशभरातून नागरीक रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवासुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे.  2017 पासून या महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विकासाला खीळ बसली आहे. शहरात स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवित असताना भाजपने भ्रष्टाचार केला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. लवकरच त्यावर कारवाई होईल. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे या शहराचा आणखी वेगाने विकास करण्यासाठी मुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवडचा विकास करणार असेही शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर म्हणाले.

  गुरुवारी (दि. 9 डिसेंबर) पिंपरी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना अहिर बोलत होते. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला शहर संघटक ॲड. उर्मिला काळभोर, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक अमित गावडे, शहर संघटक सचिन सानप तसेच गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.

   सचिन अहिर यावेळी म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या या शहरात येऊन भाजपचे कोडकौतुक करतात परंतू भाजपाने केलेल्या भ्रष्टाचारावर का दुर्लक्ष करतात ? भाजपने या शहरासाठी मागील पाच वर्षात केलेले कोणतेही पाच प्रकल्प दाखवावेत असे आव्हान अहिर यांनी केले. भाजपाच्या या भ्रष्टाचारी राजवटीला आता मतदार भुलणार नाहीत. पुढील निवडणूकांसाठी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. या महिना अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांशी संवाद साधण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा होणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पायाभूत सेवासुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापन करुन मतदारांना अपेक्षित असणारे प्रकल्प उभारले जातील यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्रावर आलेल्या सर्व संकटांचा सामना पारदर्शकपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने केला आहे. यासाठी केंद्राने कोणतीही मदत केली नाही असे सचिन अहिर म्हणाले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या