आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत आय कॉलेजची उत्कृष्ट कामगिरी


इंदापूर : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आय कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले आहे. विंझर, अमृतेश्वर महाविद्यालय,वेल्हे या ठिकाणी झालेल्या ग्रीको रोमन स्पर्धेत महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे. 

या स्पर्धेत अमर बोराटे ६७ किलो वजन गटात प्रथम, राहुल खरात १२५ किलो वजन गटात प्रथम, चैतन्य मारकड ८६ किलो वजन गटात प्रथम तर मुलींमध्ये विश्वविजया जगताप हिने ५७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. 

तसेच भोसरी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत तसेच गोळा फेक, थाळी फेक व हातोडा फेक स्पर्धेत पृथ्वीराज नलवडे याने प्रथम क्रमांक मिळविला असून आंतर विभागीय स्पर्धेतून थाळी फेक अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी तो पात्र झाला आहे. चेतन राठोड या खेळाडूने १५०० मी धावणे स्पर्धेत द्वितीय तर ५०० मी धावणे व १०००० मी धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.  संगमनेर येथे झालेल्या आंतर विभागीय बेसबॉल मुलींच्या स्पर्धेत महाविद्यालयाच्या निशा दुरुपकर, माधुरी पराडे, दीपाली शेंडगे व राधिका सुर्वे यांनी उपविजेते पद प्राप्त केले आहे. 

तसेच पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत महाविद्यालयास सांघिक विजेतेपद प्राप्त झाले असून यामध्ये ०५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात यश संपादन केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीरामपुर,जि. अहमदनगर येथे होणाऱ्या आंतर विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ, प्रा. बापू घोगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे या सर्वानी अभिनंदन केले व सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना  पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या