लोकाभिमुख गतिमान प्रशासनासाठी पोलीसांच्या वतीने फिरते पोलीस ठाणे उपक्रम


 भिमाशंकर :


     लोकाभिमुख व गतिमान प्रशासनासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू करण्यात आले. कायदा व सुवव्यवस्था ठिकवणे, ग्रामीण अधिवासी भागातील किरकोळ तंटे वेगवेगळ्या समस्याचे निरसन करणे हे उद्दीष्ट समोर ठेवून काम केले जाते.
            घोडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील अनेक गावे ही अतिदुर्गम डोंगराळ प्रदेशात वसलेली असून सदर ठिकाणी वास्तव्य करणारे नागरिक हे गरीब आदिवासी समाजातील आहेत. वाहतुकीच्या साधनांची कमतरता व लांब अंतर त्याचबरोबर या परिसरात घडणारे गुन्हे हे सौम्य स्वरूपाचे व विशेषतः भावाभावां मध्ये होणारा वाद, जमिनीवरून वाद किंवा घरामध्ये पती पत्नी/ सासु- सुना यांच्यामध्ये होणारा वाद या प्रकारातील असतात. सदरचे गुन्हे घडल्यानंतर या परिसरातील नागरिकांना पोलिस ठाण्यात येणे जाणे व याठिकाणी थांबून काम करणे  आणि त्यानंतर परत जाणे या दरम्यानच्या कालावधीमध्ये वाहतूक सुविधांचा अभाव व जंगल परिसर, जाण्या-येण्यासाठी करावा लागणारा प्रवास खर्च यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
                 यामधील अनेक गुन्हे गाव पातळीवर तडजोड होतात. म्हणून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने या सर्व गावांच्या सोयीकरिता गुन्हे,मानव मिसिंग, अकस्मात मयत, तक्रारी अर्ज किंवा इतर सर्व फौजदारी तक्रारी याकरिता  फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच पोलीस ठाणे हे बाजारच्या दिवशी किंवा यात्रा / उत्सव या दिवशी त्याचबरोबर गुन्हे घडल्यानंतर लगेच त्या गावांमध्ये जाऊन त्याची योग्य निर्गती करणार आहे.
                   फिरते पोलीस ठाणे सुरू करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या प्रमाणे कामकाजास सुरुवात केली असल्याची माहिती घोडेगावचे साहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या