Breaking News

अविवाहित राहू नका, लग्न केल्यावर डोकंही हलकं होतं - ओवैसी मुंबई: अविवाहित राहू नका. लग्न करा. लग्न केल्याने डोकं शांत राहते, असं सांगतात ज्यांनी लग्न केलं नाही त्यांनी देशाला वेठीस धरलंय, अशा शब्दात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्ला चढवला.

मुंबईत काल एमआयएमने तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी तरुणांना अविवाहित न राहण्याचा सल्ला दिला. उद्या तुम्ही लग्न करणार आहात. करणार ना? अविवाहीत राहू नका. जेवढे आहेत तेवढ्यांनी देशाला परेशान केलं आहे. त्यामुळे लग्न करा. लग्न केल्यावर डोकंही हलकं होतं, असा चिमटा ओवैसी यांनी काढला.

यावेळी ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो. केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

भाजप सत्तेत असताना जे कालपर्यंत मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करत होते, ते आज सत्तेत आहेत. पण कुठे आहे आरक्षण? तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला, असं त्यांनी सांगितलं. आरक्षण आपल्याला हवं आहे. संविधानाने मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. तुम्ही कुणालाही आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही. पण कोर्टाने सांगितल्यानंतरही आम्हाला आरक्षण दिलं जात नाही असं का? मुसलमानांना एवढा दुजाभाव का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मुस्लिम समाज शिक्षण, नोकरी आणि संपत्तीत इतरांच्या तुलनेत कसा मागे आहे याची आकडेवारीही त्यांनी वाचून दाखवली.

Post a Comment

0 Comments