खुर्चीमुक्त ग्राममंदिराची उभारणी पद्मश्री पोपरे व इंदोरीकरांच्या हस्ते लोकार्पण


घारगाव :

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला गावचे लोकनियुक्त सरपंच जालिंदर गागरे यांनी स्वखर्चातून गावात भव्य दिव्य असे ग्राममंदिर उभारले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवार (२० डिसेंबर) पद्मश्री राहीबाई पोपरे व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते झाला.
आंबीदुमाला गावची निवडणूक गेल्या दहा महिन्यांपूर्वी  झाली आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून जालिंदर गागरे निवडून आले. त्यावेळीच गावचा विकास करण्याचा चंग गागरे व त्यांचे बंधू उद्योजक बबन गागरे यांनी मनाशी बांधला होता. त्यानुसार त्यांनी प्रथम ग्रामस्थांना एकत्र केले आणि गावच्या कामाला सुरूवात केली. प्रथमगावांतर्गत असलेल्या शिवार रस्त्यांचा जटील प्रश्न सहकार्यातून सोडवला. शिवाय याकामी येणारा संपूर्ण खर्च गागरे बंधूंनी स्वखर्चातून केला. यामुळे वर्षानुवर्षापासूनचे वाद संपुष्टात येऊन दळणवळणाची सोय झाली.
सद्यस्थितीत गावचा चांगला विकास त्यांनी केला आहे. त्यामुळे हे गाव खर्‍या अर्थाने विकाचे मॉडेल बनले आहे. गावातील सर्वजण एकसमान आणि अधिकारी देखील समान असल्याचा संदेश जावा म्हणून ग्राममंदिराची उभारणी करताना खुर्चीविरहित केली. या अत्याधुनिक ग्राममंदिराचे लोकार्पण पद्मश्री राहीबाई पोपरे व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख  (इंदोरीकर) यांच्या हस्ते थाटामाटात झाले. यावेळी यशवंत प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक भांगरे, चंद्रकांत घुले, सुहास वाळुंज, गौरव डोंगरे आदिंसह पठारभागातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या