कार शिकवताना पती पत्नी विहिरीत पडले ; पत्नीचा मृत्यू


रांजणगाव गणपती:- 


करंदी (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि १४) रोजी पहाटेच्या सुमारास पती आपल्या पत्नीस चारचाकी गाडी चालविण्यास शिकवत असताना कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याचे कडेला विहिरीमध्ये पडून झालेल्या अपघातामध्ये वर्षा आदक यांचा मृत्यू झाला आहे.

शिक्रापूर येथील दिपक आदक हा पहाटे एम एच १४ डी टी २१६२ ही कार घेऊन पत्नी वर्षा हिला कार शिकविण्यासाठी गेला होता. केंदूर रोडने जात असताना करंदी गावातील पऱ्हाडवाडी रोडने पत्नी वर्षा हिला दिपक कार शिकवत असताना समोरून अचानक दुचाकी आली. यावेळी दिपक याने वर्षा हिला कारचा ब्रेक दाबण्यास सांगितले असता चुकून वर्षाने कारची रेस वाढवली त्यामुळे ताबा सुटल्याने कार शेजारील विहिरीमध्ये कोसळली. यावेळी दिपक याने तातडीने वर्षाच्या बाजूच्या काचेतून पत्नी वर्षा हिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र वर्षाला बाहेर निघता आले नाही. त्यामुळे दिपक याने स्वतः बाहेर कार मधून बाहेर निघून पत्नीला देखील ओढून बाहेर काढले आणि विहिरीतील पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला त्यामुळे शेजारी रस्त्याने जाणारे काही नागरिक या ठिकाणी धावून आले व त्यांनी दिपक आदक आणि वर्षा आदक या दोघांना बाहेर काढले.

मात्र विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वर्षा हिची कसलीही हालचाल होत नव्हती. या घटनेमध्ये वर्षा दिपक आदक (वय ३०) रा. शेखर हाईटस सोसायटी, माळीमळा रोड, तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वडगावपीर ता. आंबेगाव जि. पुणे या महिलेचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलिस पाटील वंदना साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून याबाबत दिपक प्रभाकर आदक (वय ३६) रा. शेखर हाईटस सोसायटी, माळीमळा रोड, तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वडगावपीर ता. आंबेगाव जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिलीअसुन शिक्रापूर पोलिसांनी कस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या