ओम साई पेट्रोल पंपासमोर दरोडा : अडीच लाखांचा ऐवज लंपास

 दरोडेखोरांचा त्याच परिसरात अनेक ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न

 बेलापुर  (प्रतिनिधी  )-


श्रीरामपुर बेलापुर रोडवर ओम साई पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या नेहे यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यात जवळपास अडीच लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.                                              या बाबत मिळालेली माहीती अशी की,  प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली, त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले. त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला.

 त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला. स्थानीक नागरीकांनी चोरट्यांना पहाताच पोलीसांना फोन केला. पोलीसांच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले. त्यानंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले.

 तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे वळवीला. तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला. चार जणांनी घरात प्रवेश केला. एक जण बाहेर पहारा देत होता. घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते. त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उचका पाचक केली. घरातील सोन्याची अंगठी, पोत, गळ्यातील मनीमंगळसूत्र, कानातील झुबे असा चार तोळे दागीने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात तेथुन पोबारा केला. 

पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले.

 त्यामुळे त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला. परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले. घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते.

 काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिमही घटनास्थळी पोहोचली श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली. चोरटे मराठीत बोलत होते, पुष्पा नेहे यांच्या कानातील दागीना लवकर निघाला नाही. त्यावेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या