खिल्लार खोंडावर चोरट्याला डल्ला ;

सात तासात तीन आरोपी ताब्यात


बारामती : 

बारामती तालुक्यातील पणदरे परिसरातील मानाजीनगर या ठिकाणी बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या मजुराचा चोरीला गेलेला खिल्लार खोंड (बैल) पत्रकाराच्या तत्परतेमुळे व वडगाव पोलिसांच्या गोपनीय तपासामुळे मूळ मालकाला शोधून देण्यात वडगाव पोलिसांना यश आले आहे. यातील तीन आरोपींना वडगाव पोलिसांनी चाकण येथून रात्री उशिरा ताब्यात घेतले.

 मिळालेल्या माहितीनुसार, रमेश रामा करगळ (वय २५ वर्ष) हा युवक मूळचा बीड जिल्ह्याचा मात्र सध्या ऊसतोडणीसाठी तो कुटुंबासह बारामती तालुक्यातील मानाजी नगर या ठिकाणी ऊस तोडणी साठी आला आहे. १३ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो ऊसतोडीसाठी गेला असता काही अज्ञातांनी त्याच्या कोपी वरील शर्यतीसाठी संभाळले खिलार बैल (खोंड) चोरून नेले. ऊस तोडी वरून संध्याकाळी कोपीवर आल्यावर आपले खोंड गायब असल्याचे रमेशच्या लक्षात आले. शेजारी सगळीकडे शोधूनसुद्धा खोंड सापडत नसल्याने तो व्याकुळ झाला. जिवापाड संभाळले खोंड चोरीला गेल्याने आणि त्यातच आपण दुसऱ्या जिल्ह्यात मजुरीसाठी आल्याने इथ आपली कोण दखल घेणार या विचाराने तो दोन दिवस निराश झाला होता. मात्र स्थानिक युवक पप्पू जाधव याने ही माहिती पत्रकार सचिन वाघ यांच्या कानावर घातली. वाघ यांनी पणदरे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके व पोलीस नाईक हिरालाल खोमणे यांच्याशी संपर्क करून रमेश करगळ हा तक्रार देण्यास भित असून त्याला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. मात्र आपण मजुरीसाठी दुसरीकडून इथ आलो आहे पोलीस स्टेशनच्या भानगडीत नको पडायला अशा विचारात तो होता.  पोलीस नाईक खोमणे यांनी त्याला विश्वासात घेऊन गुन्हा दाखल केला. व तपासाची चक्रे फिरवली, गोपनीय माहितीच्या आधारे हे खोंड चाकणला चोरून नेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 
 
 पोलिसांनी रात्री उशिरा चाकण येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तीन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. गुन्हा दाखल होताच अवघ्या सात तासात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरची कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, पोलीस नाईक हिरालाल खोमणे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे, पोलीस नाईक गोपाळ जाधव यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या