विनाअनुदानित शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा मनमानी कारभार


आळंदी : 
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित,श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे येथे शैक्षणिक वर्ष (२०१२-१३) पासून विनाअनुदानित शिक्षक प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत, परंतु गेली १०वर्षे शासनाचा कोणताही पगार न मिळता विनावेतन काम करत आहेत. शासनाकडूनही अद्याप कोणतेही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शासननिर्णय क्र.२०१९/३४१/टी. एन. टी. -१, दि.०१ एप्रिल २०२१ नुसार विद्यालयातील "विनाअनुदानित तत्त्वावरून अनुदानित तत्त्वावर सेवाज्येष्ठतेने नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त असणाऱ्या डी. एड. वेतनश्रेणीतील उपशिक्षक पदावर बदली नियुक्ती करणे." या मागणीसाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विनाअनुदानित शिक्षकांनी वेळोवेळी संस्थाचालकांकडे पाठपुरावे केले, तोंडी-लेखी स्वरूपात विनंती केली. परंतु शिक्षकांच्या विनंतीची संस्थाचालकांनी दखल न घेता तोंडाला पाने पुसली.
या विनाअनुदानित शिक्षकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची व बिकट झाली आहे. त्यामुळे सदरच्या मागणीसाठी दि.१८, शनिवार पासून विद्यालयातील श्रीकांत घुंडरे,योगेश मठपती,अतुल भांडवलकर,पूजा चौधरी,रवींद्र शेखरे,जगदीश गायकवाड या विनाअनुदानित शिक्षकांनी विद्यालयाच्या गेटबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे, तरी सदर आंदोलनाची संस्थेने दखल न घेतल्यास गुरुवार पासून आंदोलन तीव्र केले जाईल.असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.या विनाअनुदानित शिक्षकांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी भावना उपस्थित विद्यार्थी,पालक व पंचक्रोशीतील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या