खेळातुन घडते उत्तम व्यक्तिमत्व : कुलगुरू डाॅ. करमळकर

संजीवनी महाविद्यालयात व्हाॅलीबाॅल सामन्यांचे उद्घाटन

 

कोपरगांव प्रतिनिधी - 

खेळातुन उत्तम व्यक्तिमत्व घडते. बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. सुखमय परीस्थितीमधुन बाहेर पडून वास्तव परीस्थितीशी अथवा नव्याने  उपस्थित होणाऱ्या  घटनांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टीकोनातून  पाहिल्यास आत्मविश्वास  बळावतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर यांनी केले.
           
संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेज आयोजीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजीत पश्चिम विभाग अंतर विद्यापीठ वाॅलीबाॅल (मुली) स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. करमळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, विद्यापीठाच्या खेळ आणि शारीरिक शिक्षण  मंडळाचे डायरेक्टर डॉ. दिपक माने, अहमदनगर जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रा. भास्कर शेळके, संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे, सचिव ए. डी. अंत्रे, काॅलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांचे प्राचार्य, आदि उपस्थित होते. महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश , राजस्थान व गोवा राज्यातील सुमारे ४५ विद्यापीठांच्या मुलींच्या व्हाॅलीबाॅल संघाने या स्पर्धांसाठी हजेरी लावली. या सर्व खेळाडूंची चहा , नाष्टा, जेवण, निवास, इत्याइी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
          प्रारंभी डाॅ. माने यांनी विद्यापीठाच्या वतीने सर्व खेळाडू व त्यांच्या टीम मॅनेजर्सचे स्वागत करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खेळा संदर्भातील राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 
         डाॅ. करमळकर यांनी पुढे बोलताना सांगितले, स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडू एकत्र येवून परस्परातील संस्कृतीची देवाण घेवान होते. यात बरेच काही नवीन शिकायला मिळते. घरी असताना आपण सुखामय झोनमध्ये असतो. परंतु बाहेर पडल्यावर सर्वच काही आपल्या मनासारखे मिळेल असे नाही. यातून तडजोडीची वृत्ती विकसित होते. संजीवनी परीवाराबद्दल बोलताना ते म्हणाले, या सर्व संस्थांचे संस्थापक शंकरराव  कोल्हे १९५३ साली वयाच्या २४  व्या वर्षी  उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथिल आधुनिक शेती , शिक्षण  इत्यादी बाबींनी त्यांना अस्वस्थ केले आणि ते एक आशादायी स्वप्न घेऊन मायदेशी परतले. सहकाराच्या माध्यमातुन साखर कारखाना, बँक, पतसंस्था, दुग्ध व्यवसाय, आदी आस्थापना उभ्या केल्या आणि आज देश  पातळीवर या संस्थांचा नावलौकिक आहे. तेच स्वप्न त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत पाहिले आणि या दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या राहील्या. सहकार, शिक्षण अशा  क्षेत्रातील अभ्यास करण्याची संधी सुध्दा खेळाडूंना उपलब्ध झाली आहे. खेळाडूंनी या संधीचा सुद्धा फायदा घ्यावा, असे डाॅ. करमळकर शेवटी म्हणाले.

अमित कोल्हे म्हणाले की, अभ्यासक्रमा बरोबरच संजीवनी मध्ये खेळाला विशेष प्राधान्य देण्यात येते. खेळातुन मान, अपमान सहन करण्याची क्षमता निर्माण होते. असे सांगुन त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रा.  साहेबराव दवंगे यांनी सुत्रसंचालन केले तर डायरेक्टर डी. एन. सांगळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या