राज्यातील 18 महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची संघटना असलेली युवासेना सक्रिय झाली आहे. त्यासाठी येत्या 8 व 9 जानेवारी रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून 2 हजार पदाधिकारी, शिवसेनेचे अनेक मंत्री, नेते हजेरी लावणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समारोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आढावा घेतला.
युवासेनेच्या अधिवेशनाला युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आणि खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी आदी दिग्गज हजेरी लावणार आहेत. 8 जानेवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. समारोप संजय राऊत हे करणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उदघाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत, तर अधिवेशनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे.
0 टिप्पण्या