शेतपिके पाण्याखाली, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी


पाटस ; 

दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. पालेभाज्या,फळबागा आदींसह उभी शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत.या अवकाळी पावासामुळे अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने त्वरीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे युवा आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि कानगावचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शरद चौधरी यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपुर्वी राज्यात अवकाळी पावासाची हजेरी होण्याची शक्यता वर्तवली होती.त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण होते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अवकाळी पावसाने सुरवात केली. दौंड तालुक्यात सर्वभागात या पावसाने हजेरी लावली आहे.मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यातच आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक गावांमध्ये शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी गहू,कांदा रोपे,लागण ऊस,भाजीपाला, गुरांचा चारा आदीं शेतपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे.       

सध्याच्या या अवस्थेत शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकरांच्या  आत्महत्या वाढू शकतात. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्य ओळखून तातडीने कर्जमुक्ती व अवेळी झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी व विविध संघटना विविध प्रकारचे तीव्र आंदोलन करतील असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या