बारावी परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

 


मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board) सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीचे परीक्षा अर्ज (HSC Exam Form) स्वीकारण्यास 12 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा अर्ज दाखल करण्यास 12 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन करण्यात आलं आहे.

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रेटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.

विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट सोमवार दि. 27 डिसेंबर 2021 रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कळवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शहरी भागात काही ठिकाणी 10 किंवा 15 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला तेव्हा ओमिक्रॉनची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, आता ओमिक्रॉनचं संकट निर्माण झाल्यानं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ओमिक्रॉनमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार का हे पाहावं लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या