ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाईन निबंध स्पर्धेचे उद्घाटन


बारामती (दि:१८) रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग औंध पुणे व साधना शैक्षणिक संकुल हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिम्मित शरद रयत चषक राज्यस्तरीय शालेय माध्यमिक स्तर (इ ८ वी ते १० वी) ऑनलाईन निबंध स्पर्धेचे उदघाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते (दि:१८) रोजी बारामती येथील जिजाऊ भवन  या ठिकाणी करण्यात आले. 

 कार्यक्रमाची सुरुवात रयत गीताने झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय चेअरमन आमदार राम कांडगे यांनी केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पवार यांचे असलेले योगदान त्यांनी नमूद करत या निबंध स्पर्धेची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी  शरद पवार यांच्या राज्याच्या जडणघडणीत असलेले योगदान नमूद केले. या स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन महेंद्र जोशी यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात  डॉ अनिल पाटील यांनी २१ व्या शतकातील रयत शिक्षण संस्थेची चाललेली वाटचाल व यामध्ये शरद पवार यांचे असलेले योगदान नमूद केले.
 या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य सदाशिव सातव, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, स्कूल कमिटी सदस्य दिलीपराव ढवाण पाटील,  विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी ,सहाय्यक विभागीय अधिकारी एस टी. पवार, समन्वय समिती सदस्य बंडू पवार, विष्णू बाबर, आर.एन.आगरवाल टेक्निकल हायस्कूल चे   प्राचार्य झेड जी शेख, साधना विद्यालयाचे प्रा.विजय शितोळे,चं. बा. तुपे, कन्या विद्यालय हडपसर च्या प्राचार्या सुजाता कालेकर ,शिक्षक सदस्य गणपतराव तावरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार  किसन रत्नपारखी  यांनी तर सूत्रसंचालन  विकास जाधव व सौ उर्मिला भोसले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या