गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. अनुदान रखडल्याने केंद्रचालक अडचणीमध्ये सापडले आहेत. अनुदानच मिळत नसल्याने शिवभोज केंद्र यापुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे चालकांनी म्हटले आहे. दरम्यान अनुदानाच्या मुद्द्यावरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आधिच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता त्यात राज्य सरकारने शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे पैसे थकवल्याने ते अडचणीमध्ये आले आहेत. मात्र शिवसेना आणि राज्य सरकारला त्याच्याशी काहीही देणे -घेणे नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेचा किती जणांना फायदा झाला हा खरा-तर प्रश्नच आहे. मात्र आता गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे अनुदान रखडल्याने केंद्र चालक अडचणीमध्ये आले आहेत. त्यांचा मोठाप्रमाणात तोटा झाला आहे. अनुदानच मिळत नसल्याने ते केंद्र बंद करण्याच्या विचारात आहेत. योजना सुरू केल्यानंतर काही दिवसांमध्येच ही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढावल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
0 टिप्पण्या