जमिनीच्या वादातून पती पत्नीस मारहाण


राहुरी प्रतिनिधी, 

न्यायालयातून वाटप झालेल्या जमिनीच्या वादातून गोपीनाथ मोरे व त्यांची पत्नी मिराबाई चार जणांनी मिळून काठी व लाथाबूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दिनांक १८ डिसेंबर रोजी घडली आहे. 
       गोपीनाथ धोंडीराम मोरे वय ४५ वर्षे राहणार टाकळीमियॉ ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान गोपीनाथ मोरे हे त्यांच्या घरासमोर उभा होते. न्यायालयातून वाटप झालेल्या गोपीनाथ मोरे यांच्या जमिनीतून त्यांच्या चुलत भावास राहण्यासाठी तीन गुंठे जागा दिलेली होती. त्या वादग्रस्त जमिनीच्या वादावरून आरोपी हे सदर जागेत तार कंपाउंड करत होते. तेव्हा गोपीनाथ मोरे व त्यांची पत्नी मिराबाई हे त्यांना म्हणाले कि, ही जागा तूम्हाला रहावयास दिलेली आहे. तूम्ही तूमच्या जागेत कंपाऊड करा. आमच्या शेतात जाण्या येण्याच्या रस्त्यावर कंपाऊड करू नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी गोपीनाथ मोरे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच ही जागा आमच्या नावावर करून द्या. नाहीतर एक एकाला जिवे ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. 
        या घटनेत गोपीनाथ मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गोपीनाथ मोरे यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी बापू रंगनाथ मोरे, विठ्ठल रंगनाथ मोरे, शिवनाथ रंगनाथ मोरे, अमोल बापूसाहेब मोरे सर्व राहणार टाकळीमियॉ ता. राहुरी. या चार जणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
       या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या