Breaking News

जिल्ह्यात प्रसिध्द देव-दानव युध्दाची यात्रा आजपासून

 


पाटस : 


पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देव-दानव युध्दाचा पारंपारीक खेळ म्हणून प्रसिध्द असलेली व दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणारी दौंड तालुक्यतील कुसेगाव येथील श्री.भानोबा देवाची यात्रा यंदा सोमवार पासून सुरू होत आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर शासनाने दिलेले नियम व अटी पाळून यात्रा उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
      कुसेगाव येथील ग्रामदैवत श्री.भानोबा देवाची यात्रा मागील वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र ही यात्रा होणार असल्याने भाविकांना भानोबा देव-दानव युध्दाचा खेळ पाहता येणार आहे. सोमवारी( दि. 20) व मंगळवारी असे दोन दिवस ही यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.  यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांनी या यात्रेची जय्यत तयारी केली असून पाहुण्यांच्या आणि यात्रेसाठी येणाऱ्या  भाविकांच्या स्वागतासाठी कुसेगावकर सज्ज झाले आहेत. 
    दरवर्षी या यात्रेत श्री. भानोबा देव व दानव यांच्या पारंपारीक युध्दाचा खेळ रंगला जातो, हा खेळ पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. कोरोना या संसर्गामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदा ही यात्रा होती का नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नुकतीच कुसेगाव ग्रामस्थांची बैठक घेत शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करीत शांततेत यात्रा पार पाडण्याच्या सुचना केल्या आहेत. सोमवारी व मंगळवारी होत असलेल्या या यात्रेत दोन्ही ही दिवस श्री.भानोबा मंदीरात देवाची आरती,पुजा व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तसेच यात्रेचे प्रमुख आकर्षण असेलल्या पारंपारीक श्री.भानोबा देव व दानव यांच्या युध्दाचा खेळ ही मंदीराच्या आवारात पार पडणार आहे.अशी माहिती यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments