आपण दोन वर्षात काय विकास कामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच - राम शिंदेचे


कर्जत : 

खर्डा किल्यावरील स्वराज्य ध्वज हा बारक्या पवारांचा आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पवार साहेब त्या कार्यक्रमास आले नाहीत. भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो माझ्या वारकरी बंधुंचा आहे मात्र यांनी तो स्वतःचा केला. त्यामुळे 18 दिवसांतच तो फाटला आणि आता फक्त तेथे दांडाच शिल्लक राहिला. जातीपातीचे राजकारण करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची असे विद्यमान लोकप्रतिनिधी करीत आहे. यांनी दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे, असे म्हणत राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. कर्जत येथे भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते. 

यावेळी खा सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे,  युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते. सोमवारी दुपारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.          

खा. सुजय विखे म्हणाले, ज्या माणसाने मोठे करून विविध पदे दिली. आज त्यानीच राम शिंदेंचा विश्वासघात केला. त्यामुळे आजची निवडणूक ही भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी अशी नसून ती विश्वासघातकी माणसाची लायकी दाखविणारी आहे. राम शिंदे यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे. कारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. आमचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या हवाली केले आहे. त्यामुळे जनतेनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन खा. विखे यांनी उपस्थित जनतेला केले. विरोधकानी प्रदीर्घ काळ नुसते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी लावला. याचाच अर्थ त्यांनी राम शिंदे आणि भाजपाचा मोठा धसका घेतला आहे हे अधोरेखित होत असून आगामी निवडणुकीत भाजपला साथ द्यावी, असे म्हणाले.

 यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, आरपीआयचे शशिकांत पाटील, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, वैभव शहा, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी इच्छुक उमेदवार, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजपा समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जेवरे यांनी केले तर आभार अनिल गदादे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या