Breaking News

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान


घारगाव : 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी सकाळ पासून संगमनेर तालुक्यातील पठार भागात रिमझिम पाऊस बरसला. यामुळे आता, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.
सकाळपासूनच वातावरणात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळाले. एकीकडे थंडीचा घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारस पावसाच्या सरी कोसळल्यामुळे कांदा उत्पादकांसह इतर शेतकरी धास्तावले आहेत. या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पठारभाग म्हटला की, नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तरीही शेतकरी दुष्काळाशी तोंड देत विविध पिके घेत असतात. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने शेतकर्‍यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. एकामागून एक आलेल्या सुलतानी संकटांनी शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. इकडून-तिकडून शेतकर्‍यांनी गावठी कांद्याच्या लागवडी केल्या असून काही शेतकर्‍यांचे लाल कांदे काढण्याचे कामही सुरू असून तेही कांदे पावसाने भिजून गेले आहे त्यातच बाजारभाव नसल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहे.
पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा अतोनात नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतात काढलेला कांदा जमिनीत खराब होत आहे. लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

Post a Comment

0 Comments