Corruption : लाचखोरीमुळे देशाचे ४५० अब्ज डॉलरचे नुकसान..!

भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड...

भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे आणि ही कीड देश पोखरत चालली आहे. देशातील काही  सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी देशातील भ्रष्टाचार संपवण्याची प्रतिज्ञा केली होती पण देशातील भ्रष्टाचार संपवणे तर दूरच उलट भ्रष्टाचार वाढत चालला असल्याचे अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रेटी या संस्थेने म्हटले. ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रेटी ही वाशिंग्टन येथील संस्था असून  जगभरातील विविध देशांत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा सर्व्हे ही संस्था करते. या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार गेल्या सत्तर वर्षात  लाचखोरीमुळे देशाचे ४५० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.  


४५० अब्ज डॉलर ही काही छोटी रक्कम नाही. भ्रष्टाचाऱ्यांनी ४५० अब्ज डॉलर पचवले. हे ४५० डॉलर गोरगरिबांच्या मेहनतीचे होते मात्र भ्रष्टाचाऱ्यांनी खुर्ची आणि पदाचा गैरवापर करून गोरगरिबांना फसवले. देशाला लाचखोरीची ही कीड आता लागलेली नाही. स्वातंत्र्यापासून हा भ्रष्टाचार सुरू आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एकदा उद्विग्न होऊन म्हणाले होते की भ्रष्टाचाऱ्यांना सुळावर लटकावले पाहिजे.  मात्र आजवर एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला सुळावर लटकवणे तर दूरच मोठी शिक्षा झाल्याचे दिसत नाही. देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते २०१४ साली दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. आता सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशभर भ्रष्टाचाराविरुद्ध वातावरण होते. त्यावेळी देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल असे वाटले होते. त्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. 

भाजप केंद्रात सत्तेवर आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ना खाऊंगा.... ना खाने दुगा' असा इशारा भ्रष्टाचाऱ्यांना दिला. देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नोटबंदी केली. देशातील लोकांना वाटले आतातरी भ्रष्टाचार संपेल. मात्र तसे काही झाले नाही. गेल्या सात वर्षात भ्रष्टाचार कमी झाला नाही. ट्रेस मेट्रिक्स २०२१ च्या अहवालात भारत लाचखोरीत ८२ व्या स्थानी असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ देशातील भ्रष्टाचार कमी झाला नाही. आज कोणत्याही सरकारी कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की लाचखोरीची एक तरी बातमी वाचायला मिळतेच. 

जनताही मजबूर आहे.  याच मजबुरीचा फायदा घेऊन लाचखोर त्यांना जाळ्यात अडकवत आहेत. लाच दिली नाही तर काम होत नाही असाच अनुभव देशातील बहुतांश जनतेला आला आहे. राजस्थानमधील ८० टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की कोणतेही काम करण्यासाठी लाच द्यावीच लागते. म

हाराष्ट्रातीलही ५५ टक्के लोकांचे हेच म्हणणे आहे. याचाच अर्थ लाचखोरी सामान्य होत आहे. पूर्वी भ्रष्टाचाऱ्यांकडे द्वेषभावनेने पाहिले जात होते आता मात्र त्यांच्या संपत्तीवरून त्यांचा सन्मान होत आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे. 
- श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या