24 जानेवारीपासून शाळा सुरू

 

मंत्रिमंडळाची मंजुरी; ना. आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा देखील 24 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

कोविड एसओपीचे पालन करत मुंबईतील शाळा उघडणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कौल देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने, मुंबईतील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार, 24 तारखेपासून कोविड एसओपीचा पालन करून उघडतील.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, "सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत." पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या