मुंबई : इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीला कोणाची ताकद किती याचा अंदाज येऊ शकेल. राज्यातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करतानाच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. यानुसार भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या वर्गासाठी उद्या मतदान होईल. ४१३ जागांसाठी मतदान होत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागांवर इतर मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केले होते. पण हे आश्वासन सर्व राजकीय पक्षांकडून पाळण्यात आलेले नाही. निवडून येण्याची क्षमता या आधारावरच उमेदवारी देण्यात आली आहे, असे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे. ३२ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या निमित्ताने भाजप की महाविकास आघाडीची ताकद अधिक याचा अंदाज येऊ शकेल.
0 टिप्पण्या