शेतातील वादातून एकास बेदम मारहाण


रांजणगाव गणपती:-
शेतातून गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा पाईप कापल्याच्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कर्डेलवाडी (ता. शिरुर)
घडली असुन याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात रामदास खंडू कऱ्हे (वय ६५ वर्षे) यांनी फिर्याद दाखल केल्याने १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कर्डेलवाडी येथील धनगरवाडी येथे रामदास कऱ्हे यांची शेती असून त्यांच्या शेतातून राजू कऱ्हे यांची पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. रामदास यांच्या शेतातून गेलेली पाईप लाईन अचानक फुटल्याने  राजू कऱ्हे व त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी रामदास कऱ्हे यांच्या घरासमोर जात आमची पाईपलाईन तू का कापली असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच  कुऱ्हाड घेऊन रामदास कऱ्हे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी रामदास यांनी आरडाओरडा केल्याने त्यांची पत्नी, भाऊ आदी लोक त्यांना सोडविण्यासाठी आले असताना मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली यामध्ये रामदास कऱ्हे जखमी झाले आहेत. 

त्यामुळे त्यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने राजू उर्फ पिनू कऱ्हे, पांडा म्हसू कऱ्हे, नाना म्हस्कू कऱ्हे, करण पांडा कऱ्हे, अनिल नाना कऱ्हे, सोनू पांडा कऱ्हे, सुनिता नाना कऱ्हे, कमल पांडा कऱ्हे, रेश्मा राजू कऱ्हे, लक्ष्मी म्हस्कू कऱ्हे या दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या