महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा

 

मुंबई : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव आज मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर सहभागी झाले होते. ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या