दुर्गाताई तांबे यांना उमंग फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार


संगमनेर :

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम, अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम यांसह सातत्याने जनमानसांच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या संगमनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना उमंग फाउंडेशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक येथील उमंग फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी नाशिक येथे दुर्गाताई तांबे यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी अभिनेत्री अश्विनी महागडे, सुनंदाताई पवार, विद्या आहेर व उमंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून खेडोपाडी गावोगावी महिलांचे संघटन करुन महिलांची सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली आहे. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्र, वाचन ग्रुप, सहली याच बरोबर सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत.  नगरपालिकेच्या लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छतेवर अधिक भर देताना शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तसेच  स्वच्छ भारत अभियानातील उत्कृष्ट कामगिरीमुळे संगमनेर नगरपरिषदेला दिल्लीत राष्ट्रपती पुरस्काराने ही गौरवले आहे. आणि राज्यपातळीवर महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कारांनी नगरपालिकेचा सन्मान केला आहे.

यापूर्वीही लेखिका, साहित्यिक, असलेल्या सौ.दुर्गाताई तांबे यांना बुलढाणा येथील स्वर्गीय विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार,स्वामी विवेकानंद पुणे प्रतिष्ठानचा पुरस्कार,सावित्रीबाई फुले पुरस्कार ,यशवंत वेणू पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या