शैक्षणिक संस्थांच्या समस्यांनिवारणासाठी सहविचार बैठक

उरुळी कांचन  :


उरुळी कांचन येथे खाजगी, विना अनुदानित, अनुदानित शिक्षण संस्था चालकांच्या, शैक्षणिक संस्थांच्या समस्यांची माहिती करून घेणारी सहविचार बैठक नुकतीच पार पडली. यावेळी संस्थाचालक शिक्षण महामंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजयराव कोलते बोलत होते.

                    आपल्या भाषणात कोलते पुढे म्हणाले की, युती शासनाने शिक्षणक्षेत्रा सारख्या पवित्र क्षेत्रात अ-पवित्र पोर्टल आणून शिक्षण संस्थांची वाट लावण्याचे काम केलेले आहे, त्यामध्ये अनेक त्रुटी असून त्या दूर केल्याशिवाय शिक्षण संस्था व्यवस्थित चालणार नाहीत. म्हणून आपण सर्वांनी या पवित्र पोर्टलच्या विरोधात एकत्र येऊन, तीव्र लढा देत आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. तसेच शिक्षण संस्था चालकांनी जागृत राहून येणाऱ्या अडचणींवर प्रखर निषेध व नाराजी व्यक्त करून सोडवणूक करून घेतली पाहिजे. सध्या विनाअनुदानित शाळांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नसल्याने आणि शिक्षक व कर्मचारी भरती बंद असल्याने संस्थाचालक अडचणीत आलेले आहेत. शासनाने शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणे गरजेचे झाले आहे, वेगवेगळ्या मागण्या यावेळी संस्था चालकांनी या बैठकीत केल्या.

यावेळी पुणे जिल्हा संस्था चालक संस्थेचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव भूमकर, गुरुमुख नारंग, सचिव घोगरे, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन, विश्वस्त महादेवराव कांचन, संभाजीराव कांचन,वढू येथील सैनिकी स्कूलचे संस्थापक माजी आमदार दीपक पायगुडे, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बबनराव दिवेकर आदीसह अन्य संस्थांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते‌‌.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या