किराणा दुकानात वाईन: अण्णा हजारे सरकारवर भडकले, म्हणाले…


किराणा दुकाने व सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला मान्यता देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

किराणा दुकानांतून वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका सुरूच

समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली नाराजी

शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळवून देण्याची मागणी

किराणा दुकानात वाईन: अण्णा हजारे सरकारवर भडकले, म्हणाले…

अहमदनगर : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हा निर्णय दुर्दैवी असून जर शेतकऱ्यांचे हित पहायचे असेल तर त्यांच्या पिकांना हमी भाव मिळवून द्यावा,’ असे हजारे यांनी म्हटले आहे. ‘वाईन म्हणजे दारू नाही’ या युक्तिवादाचाही त्यांनी समाचार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि मोठ्या किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर हजारे यांनी म्हटले आहे, ‘हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे, असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार? हा खरा प्रश्न आहे. वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुल्या विक्रीला परवानगी दिली जात आहे. त्यातून एका वर्षात एक हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दिष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार? हा खरा प्रश्न आहे, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

मद्यावरील करांसंबंधीच्या जुन्या निर्णयावर हजारे यांनी म्हटले आहे, ‘२० नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करून मद्य स्वस्त करण्यात आले. यातून अडीच लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल १०० कोटीवरून २५० कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो. काल सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे, तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे.’ असेही हजारे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या