कौटुंबिक वादातून आर्थिक होरपळलेल्या ६६ महिलांना रोजगार

स्वयंसिद्धा उपक्रमामुळे महिलांना मदत

पुणे : कौटुंबिक वाद, आर्थिक होरपळ अशा संकटात सापडलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात राबविण्यात आलेल्या स्वयंसिद्धा उपक्रमामुळे ६६ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


स्वयंसिद्धा उपक्रमामुळे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसेही मिळत असल्याने त्यांना महागाईच्या तडाख्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयात गेल्या पाच वर्षांत ६६ महिलांनी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे विनामूल्य प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी न्यायालयातील विवाह समुपदेशकांच्या मदतीने स्वयंसिद्धा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे काही महिलांना खासगी क्षेत्रात नोकरीही मिळाली आहे. काहीं महिलांनी टेलिरग, फॅशन डिझायिनग, ब्युटी पार्लर असे व्यवसाय सुरू केले आहेत.

कौटुंबिक न्यायालयातील न्यायप्रविष्ट प्रकरणात पतीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्या महिलांना पोटगीची रक्कम कमी मिळाली आहे. काहींचे पती वेळेवर पोटगीची रक्कम भरत नाहीत. अशा महिलांना संसार करताना तसेच मुलांचे संगोपन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा महिलांना सक्षम करण्यासाठी २०१७ पासून स्वयंसिद्धा उपक्रम राबविण्यात येत आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश मनीषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह समुपदेशक राणी दाते, डॉ. सुरेश सूर्यवंशी या उपक्रमाचे कामकाज पाहत आहेत. रोटरी क्लब ऑफ गांधी भवन, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रेणुका स्वरुप करिअर इन्स्टिटय़ूट, टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्र, लाइट हाऊस व्यवसाय प्रशिक्षण संस्था अशा संस्थांनी या उपक्रमासाठी सहाय्य केले आहे.

चौकट
कार्यालय व्यवस्थापन, फॅशन डिझायिनगर, टेलिरग काम, ब्युटी पार्लर, पुष्परचना, परिचारिका प्रशिक्षण, बालवाडी प्रशिक्षक अशा अभ्यासक्रमांचे महिलांना स्वयंसिद्धा उपक्रमातर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांचे वय आणि त्यांची गरज विचारात घेऊन त्यांना अभ्यासक्रमाची निवड करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. ज्या महिलांना प्रवास खर्च परवडत नाही. त्यांचा बस पासचा खर्चही केला जातो.
- डॉ. सुरेश सूर्यवंशी,
 विवाह समुपदेशक, 
कौटुंबिक न्यायालय


चौकट
कौटुंबिक वादामुळे महिलांना आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करणे तसेच त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्वयंसिद्धा उपक्रम कौटुंबिक न्यायालयात राबविण्यात आला आहे. आतापर्यंत ६६ महिलांना रोजगारविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- सुभाष काफरे, 
प्रमुख न्यायाधीश,
 कौटुंबिक न्यायालय शिवाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या