देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर!

पंतप्रधानांनी बोलावली ३० मुख्यमंत्र्यांची बैठक 

नवी दिल्ली :  कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि इतर व्हेरियंटचा संसर्ग देशात वाढत आहे. दररोज दीड लाखांवर रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ३० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देशाची वाटचाल तिसऱ्यांदा लॉकडाऊनच्या दिशेने सुरु असून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढल्यास तसा निर्णय होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत १३ तारखेला म्हणजे गुरुवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला ३० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 
देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येने मोठी उसळी घेतली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांनी देशात तिसरी लाट सुरू झाल्याचा दावा केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रविवारी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी जिल्हा पातळीवर आरोग्यसंबंधीच्या पायाभूत सुविधा वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरण मोहीमेला वेग देण्याची सूचनाही केली. कोरोनाविरोधी लढाईत लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
------------------------------------
२४ तासांत कोरोनाचे १ लाख ६८ हजारांवर रुग्ण वाढले!
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६८ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ८ लाख २१ हजार ४४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या गेल्या २०८ दिवसांतील सर्वाधिक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या