चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या : ३२८ किलो चंदन जप्त

शिरुरकासार  : चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्कडपिंप्री परिसरात चंदन चोरी करून ते एका गोडाऊनमध्ये छाटत असताना रात्री पंकज कुमावत यांनी छापा टाकून १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ३२८ किलो चंदनासह चार मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल असा एकूण ९ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे तीन वाजता चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्कडपिंप्री येथे करण्यात आली.


चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. रोज वाळुचा अवैध उपसा आणि त्याची वाहतूक पोलिसानां दिसत नाही. आता तर या परिसरात चंदन तस्करांचीही टोळी सक्रिय असल्याचे रात्रीच्या कारवाईवरून उघड झाली. काल पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी चकलांबा परिसरात चंदनाची तस्करी होत असून एका पत्र्याच्या शेडमध्ये ते चंदन ठेवले असून त्याची छाटणी सुरू असल्याचे त्यांना कळाल्यानंतर याची माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना दिली. त्या माहितीवरून स्वत: पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाने पहाटे तीन वाजता उक्कडपिंप्री येथे छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेडमध्ये १७ चंदन तस्कर चंदन छाटत असताना मिळून आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेत तेथील ३२८ किलो चंदन जप्त केले. चंदनाची किंमत ७ लाख ८७ हजार रुपये आहे. या वेळी त्याठिकाणी ४ मोटारसायकल, मोबाईल आणि इतर असा ९ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. यामध्ये १७ चंदन तस्करावर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, एपीआय संतोष मिसळे, पोलीस हवालदार बालाजी दराडे , बाबासाहेब बांगर,राजू वंजारे , महादेव सातपुते, संजय टुले, इनामदार यांच्यासह आदींनी केली.

चौकट

अवैध धंद्यांकडे चकलांबा पोलिसांचे दुर्लक्ष

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे दोन दिवसांपूर्वीच तिंतरवणी व तांदळा येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करत मोठ्याप्रमाणात सोने व रोख रक्कमेवर डल्ला मारला. दरम्यान अवैध वाळू उपसा होत आहे. चकलांबासह परिसरात मोठमोठे क्लब, जुगार अड्डे सुरू आहेत तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जाते. जे कुमावतांना दिसतं ते चकलांबा पोलिसांना का दिसत नाही का असाही प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या